शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव येथे एका धक्कादायक घटनेत अमरावती जिल्ह्यातील २९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव अंकुश दिलीप बोरखे (वय २९ वर्षे, रा. लोणी ता. वरूड, जि. अमरावती) असे असून, त्याने शेगाव येथील शासकीय स्वागत कक्षाच्या इमारतीवरून उडी मारल्याने गंभीर दुखापत झाली होती.
घटनेनंतर संबंधित युवकाला पहाटे सुमारे ३.३० वाजता सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालय, शेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस कर्मचारी हेड कॉन्स्टेबल नीलेश गाडगे यांनी तत्काळ त्याला रुग्णालयात भरती केले.
मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही सकाळी ६.१५ वाजता उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉ. सुनील देशमुख यांनी दिलेल्या मेमोमध्ये नमूद करण्यात आली आहे.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पो.हे.का. नीलेश गाडगे व पो.उ.नि. गजानन गावंडे करीत आहेत.







