शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील भीमनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बळीराम गुरुजी ते गोवर्धन शेगोकार यांच्या घरापर्यंतच्या भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
मनसे पदाधिकाऱ्यांनी मा. मुख्याधिकारी, नगर परिषद शेगाव यांची भेट घेऊन संबंधित भागातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी प्रशासनाकडून लवकरच प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
निवेदनादरम्यान यापूर्वी भोईपुरा परिसरातील खराब रस्त्याबाबत देण्यात आलेल्या निवेदनाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित रस्त्यावर तातडीने मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करण्यात येईल, अशी हमी मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष नितीश भावरकर, माजी शहराध्यक्ष राहुल धानोकार, सचिन नागे, समाधान शेगोकार, धनंजय लोखंडे, ज्ञानेश्वर नंदाने यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच या अभियानासाठी शहराध्यक्ष परमेश्वर लाहूडकर, शहर उपाध्यक्ष विनोद फुंडकर, सोपान बघेवार आणि योगेश खांडेकर यांनी विशेष सहकार्य केले.








