शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने प्रवाशाच्या खिशातून 12 हजार 200 रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोपाल सोनाजी डाबेराव (वय 53 वर्षे, रा. शेगाव, ता. शेगाव, जि. बुलढाणा) हे समाज कल्याण विभागात नोकरी करतात. दिनांक 4 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 9.30 वाजता ते अकोला येथे दवाखान्याच्या कामासाठी जाण्यासाठी शेगाव बसस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बसची वाट पाहत उभे होते.
दरम्यान, सकाळी अंदाजे 9.45 वाजता अकोला जाणारी बस प्लॅटफॉर्मवर लागल्यानंतर बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली. यावेळी फिर्यादी बसमध्ये चढल्यानंतर तिकीट काढण्यासाठी पॅन्टच्या खिशात हात घातला असता खिशात ठेवलेली 12 हजार 200 रुपयांची रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने खिशातून रोकड लंपास केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अन्वये कलम 303(2) BNS अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका श्याम आघाव हे करीत आहेत.







