शेगाव I (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 27 जून – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात सिमेंटच्या धुळीच्या कारणावरून दोन शेजारी कुटुंबांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने शेगाव शहर पोलिसांनी दोन्ही गटांतील आठ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र भावजी वाघ (वय 53) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, शेजारी असलेल्या विजय तायडे यांच्या घराचे बांधकाम सुरू असून त्यांच्या वाहनावर सिमेंटची धूळ पडल्याबाबत बोलत असताना विजय तायडे, विशाल तायडे, गोपाल तायडे व जयकिसन तायडे यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर विशाल तायडे याने लोखंडी रॉडने उजव्या पायावर मारहाण करून जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूने विशाल विजय तायडे (वय 35) यांनी दाखल केलेल्या तक्रारीत राजेंद्र वाघ हे घरासमोर येऊन सिमेंटच्या धुळीवरून वाद घालत शिवीगाळ करू लागल्याचा आरोप केला आहे. वाद सुरू असताना विशाल तायडे यांची आई लता तायडे भांडण सोडविण्यासाठी आल्यावर राजेंद्र वाघ यांनी त्यांना ढकलून दिल्याचा तसेच लोखंडी रॉडने विशाल तायडे यांच्या डाव्या हातावर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी करुणा वाघ, रुपाली वाघ आणि कोमल वाघ यांनीही मारहाण व धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास जीपीएसआय गावंडे करीत आहेत.









