शेगाव |(डी ललित) : श्री गजानन महाराज संस्थान, शेगावच्या वतीने श्री गजानन महाराजांचा ११६ वा पुण्यतिथी उत्सव दि. १२ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. उत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दररोज सकाळी ६ ते ६.४५ वाजता काकडा, सकाळी ७.३० ते ९ वाजता गाथा भजन, दुपारी ४ ते ५ वाजता प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ वाजता हरिपाठ आणि रात्री ८ ते १० वाजता श्रीहरी कीर्तन असे कार्यक्रम पार पडले.
या सप्ताहात श्री ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते, शिरसोली, श्री ह.भ.प. सुरेश बुवा बाकडे, पोफाळी, श्री ह.भ.प. भरत बुवा चौधरी, म्हैसवाडी, श्री ह.भ.प. अच्युत बुवा दस्तापूरकर, परभणी आणि श्री ह.भ.प. निवृत्ती बुवा तराळे, व्याळा आदी कीर्तनकारांची कीर्तने झाली. त्यामुळे संपूर्ण उत्सव काळात शेगाव नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
श्री गणेशयाग व वरुणयागास भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून प्रारंभ झाला. भाद्रपद शुद्ध चतुर्थी रोजी सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती करण्यात आली. तसेच श्रींच्या समाधी सोहळ्यानिमित्त श्रीहरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमानंतर समाधी सोहळ्याची सांगता झाली.
यावर्षीच्या पुण्यतिथी उत्सवात श्रींच्या सेवेत तब्बल ३९७ दिंड्यांनी सहभाग घेतला. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या ८० नवीन दिंड्यांना संस्थानतर्फे १० टाळ, १ वीणा, १ मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत यांसह संत वाङ्मय आणि श्री माऊली पताका वितरित करण्यात आल्या. जुन्या दिंड्यांना भजनी साहित्याच्या दुरुस्तीसाठी नियमानुसार सानुग्रह अंशदान तसेच इतर व्यवस्थेसाठी सहयोग देण्यात आला.
उत्सवानिमित्त शेगावात दाखल झालेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी भोजनप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत विसावा संकुल येथे प्रथमोपचार केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
दरम्यान, श्री गजानन महाराज संस्थानच्या शेगाव शाखेसह पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर आणि गिरडा या शाखांवरही श्रींचा समाधी उत्सव भक्तिभावाने संपन्न झाला. या सर्व ठिकाणी मिळून तब्बल १ लाख १० हजारांहून अधिक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
अशा प्रकारे श्री गजानन महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त वारकरी आणि भाविकांची सेवा करण्याचे कार्य श्रींच्या कृपेने पार पडल्याचे श्री गजानन महाराज संस्थानतर्फे कळविण्यात आले. (युवा क्रांती वृत्तसेवा)









