शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा):शेगाव शहरातील सावता चौक परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीमती शंकुतला सुखदेव असोलकर (वय 77 वर्षे) या 9 मे 2026 रोजी दुपारी फिजिओथेरपीसाठी काठोळे हॉस्पिटल येथे गेल्या होत्या. त्यानंतर त्या घरी परत आल्यावर त्यांच्या मुलगी व जावयाने सोन्याच्या पोथी नव्याने गाठून घेण्यासाठी आलमारीची चावी शोधली असता ती जागेवर दिसून आली नाही.
यानंतर दुसऱ्या चावीने आलमारी उघडून पाहिले असता आतमधील लॉकर उघडे असल्याचे निदर्शनास आले. लॉकरमधून 20 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या पोथी तसेच पर्समधील 5 हजार 500 रुपये रोख रक्कम चोरी झाल्याचे आढळून आले. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 25 हजार 500 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरी केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. शेगाव शहर पोलीसांनी भारतीय न्याय संहिता कलम 305(1) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वाकेकर करीत आहेत.








