शेगावातील भीमनगर परिसरातील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल.
शेगाव, दि. 22 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): श्री संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे 69 हजार रुपये किमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत चोरून नेल्याची घटना शेगावातील भीमनगर परिसरात घडली आहे.
याप्रकरणी सौ. सुनिता राजेश मसने (वय 45, रा. वाडेगाव, ता. बाळापूर, जि. अकोला) यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी या 21 जून रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत असताना गर्दीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात इसमाने चोरून नेली.
या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. 394/2026 अन्वये कलम 303(2) भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक रवि इंगळे करीत आहेत.








