शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि.६ जून -श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेले एक 58 वर्षीय भाविक अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक 37/2026 अन्वये नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल दत्तात्रय देशमुख (वय 32, व्यवसाय शेती, रा. जैन मंदिर, भोकरदन जि. जालना) यांनी तक्रार दिली आहे. त्यांचे वडील दत्तात्रय विनायकराव देशमुख (वय 58) हे कुटुंबासह श्री संत गजानन महाराज मंदिर येथे दर्शनासाठी आले होते. ते वारकरी भक्त निवास येथे मुक्कामी थांबले होते.
दि. 03 जून रोजी रात्री सुमारे 10 वाजता फिर्यादी यांना त्यांच्या आईचा फोन आला होता. त्यावेळी दत्तात्रय देशमुख हे अस्वस्थ अवस्थेत बडबड करत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. 04 जून रोजी पहाटे सुमारे 4 वाजताच्या सुमारास श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातून ते कुठेतरी निघून गेले व त्यानंतर ते दिसून आले नाहीत.
कुटुंबीयांनी शेगाव शहर, मंदिर परिसर, बसस्थानक, रेल्वे स्टेशन तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर शेगाव शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे —
दत्तात्रय विनायकराव देशमुख, वय 58 वर्षे, बांधा मजबूत, रंग गोरा, उंची अंदाजे 5 फूट, समोरून टक्कल पडलेले केस, अंगात फिकट भगवा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट.
सदर प्रकरणाचा तपास जि.पो.उपनि. गावंडे साहेब यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. नागरिकांना संबंधित व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास शेगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








