शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील मिलींद नगर परिसरातील ६५ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक २९/२०२६ नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नपूर्णा श्रीराम शेगोकार (वय ६५, रा. मिलींद नगर, नागझरी रोड, शेगाव) या ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी शहरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत.
याबाबत सौ. लक्ष्मी विनोद शेगोकार (वय २९) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
बेपत्ता महिलेचे वर्णन असे की, उंची सुमारे ५ फूट, रंग सावळा, केस काळे-पांढरे व मध्यम लांबीचे आहेत. अंगात फिकट गुलाबी रंगाचा गाऊन, पायात काळ्या-लाल रंगाच्या स्लीपर चप्पल असून हातात चांदीचे कडे आहेत. तसेच त्यांच्या उजव्या हात व पायाला पक्षाघात (पॅरालिसिस) असल्याची माहिती आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून नागरिकांनी संबंधित महिलेबाबत काही माहिती असल्यास त्वरित शेगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







