शेगाव, दि. 22 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहरातील जोगडी फैल परिसरातून 60 वर्षीय व्यक्ती घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोरकुमार राधेश्याम मिश्रा (वय 60 वर्ष) हे 20 जून 2026 रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास जोगडी फैल, परशुराम भवन जवळील राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले. त्यानंतर नातेवाईकांनी व परिसरात त्यांचा शोध घेतला, मात्र ते आढळून आले नाहीत.
बेपत्ता व्यक्तीचा रंग गोरा, उंची सुमारे 5.8 फूट, मजबूत बांधा असून अंगात काळ्या रंगाचा टी-शर्ट, कॉफी रंगाची पॅन्ट व पायात चप्पल असल्याचे वर्णन देण्यात आले आहे.
याप्रकरणी सौ. श्रद्धा किशोरकुमार मिश्रा यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मिसिंग क्रमांक 45/2026 नुसार नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक गजानन गावंडे करीत आहेत.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सदर व्यक्तीबाबत कोणाला माहिती मिळाल्यास तात्काळ शेगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.








