शेगाव | (डी ललित) : शेगाव नगरपरिषदेच्या अधिग्रहण प्रकरणाशी संबंधित दुकान विक्रीच्या मुद्द्यावर नगरसेविका सीमा प्रमोद ओवे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांच्याविरोधात शेगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार (कैफियत) दाखल केली आहे. नगरपरिषदेच्या सभागृहाची व शासनाची पूर्वपरवानगी न घेता नगरपरिषदेच्या मालकीची दुकाने विक्रीसाठी प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.
तक्रारीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 30 एप्रिल 2026 रोजी नगरपरिषद सभागृहाने संबंधित दुकानांचे क्रमांक व विक्री मूल्यांकन सभागृहासमोर सादर करण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र, या ठरावाची अंमलबजावणी न करता मुख्याधिकाऱ्यांनी परस्पर नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडे परवानगीसाठी पत्रव्यवहार केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगर अधिनियम 1965 नुसार सभागृह व शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय नगरपरिषदेच्या मालमत्तेची विक्री करता येत नाही. तसेच संबंधित दुकानांचे मूल्यांकनही अद्याप प्राप्त झालेले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
नगरसेविका सीमा ओवे यांनी या संपूर्ण व्यवहारात अनियमितता व संभाव्य भ्रष्टाचाराची शंका व्यक्त करत मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच नगरपरिषदेची दुकाने कोणतीही वैधानिक परवानगी मिळण्यापूर्वी विक्री करू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या तक्रारीच्या प्रती दुय्यम निबंधक, नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे उपायुक्त तसेच बुलढाणा जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणात मुख्याधिकारी जयश्री काटकर यांची भूमिका किंवा प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकलेली नाही. (युवा क्रांती वृत्तसेवा)








