शेगांव (प्रशांत पवार) : शहरातील जुना चिंचोली रोड ते चिंचोली शिवदांड या मार्गाची गेल्या दीड ते दोन वर्षांपासून दुरवस्था झाली असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी तसेच सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी रोकडीया नगर परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगर परिषदेकडून भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी हा रस्ता खोदण्यात आला होता. या कामाला जवळपास दीड ते दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. तसेच रस्त्यावरील चेंबरचे काम पूर्ण होऊनही सुमारे ९ ते १० महिने झाले आहेत. मात्र, अद्याप रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या रस्त्यालगत असलेल्या रोकडीया नगर, नालंदा कॉलनी, सरस्वती विहार, बीपी सांप्रदाय नगर तसेच इतर नवीन वस्त्यांमधील सांडपाणी वाहून श्री. पाटील यांच्या शेताजवळील नाल्यात जमा होते. मात्र, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने हे घाण पाणी रस्त्यावर साचत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले असून डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन जुना चिंचोली रोडची दुरुस्ती करावी, सांडपाण्याची कायमस्वरूपी योग्य विल्हेवाट लावावी आणि परिसरातील नागरिकांना दुर्गंधी व डासांच्या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी रोकडीया नगर व जुना चिंचोली रोड परिसरातील नागरिकांनी केली आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)









