शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यातील ३३ पोलिस ठाण्यांमध्ये शेगाव शहर व ग्रामीण पोलिसांनी अव्वल स्थान मिळवत उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र पटकावले.) – जिल्हा पोलिस दलात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्याची परंपरा कायम ठेवत यंदा शेगाव शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याने अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्ह्यातील एकूण ३३ पोलिस ठाण्यांमधून तत्काळ माहिती मुख्यालयाला पाठविण्यात शेगाव पोलिसांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
पोलिस दलातील प्रत्येक ठाण्यात घडणाऱ्या घटनांची माहिती त्वरित मुख्यालयात पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे असते. ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून प्रशस्तीपत्र देऊन केला जातो.
शेगाव शहर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम थारकर (३ वर्षांपासून सेवा) आणि महिला पोलिस छाया निकस (दीड वर्षांपासून सेवा) यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घटना वेळेत व अचूकपणे मुख्यालयी पाठवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबल यशोदा सूरगडे यांनाही उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सदर प्रशस्तीपत्र दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी, डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या कामगिरीमुळे शेगाव शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांनी संपूर्ण जिल्ह्यात आपला ठसा उमटवला असून, “आमच्या तालुक्याचे नाव उंचावले” अशी भावना पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.







