---Advertisement---

शेगावात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; परीक्षा गैरव्यवहाराविरोधात तहसीलदारांना निवेदन!!

---Advertisement---

शेगाव |(डी ललित) : दि. २१ जुलै-देशभरातील स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि शासकीय भरती प्रक्रियेत होत असलेल्या कथित पेपरफुटी, गैरव्यवहार आणि अनियमिततेविरोधात आज दि. २१ जुलै रोजी शेगाव शहरातील विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढत तहसील कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात सुमारे १५० ते २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

गेल्या काही दिवसांत विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि करिअरचे भविष्य धोक्यात आल्याची भावना व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनांबद्दलही आंदोलकांनी चिंता व्यक्त केली.

याशिवाय, शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही विद्यार्थ्यांनी पाठिंबा जाहीर केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शांततेत निघालेला मोर्चा शेगाव तहसील कार्यालयात पोहोचला. तेथे विद्यार्थ्यांनी तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर केले.

निवेदनातील प्रमुख मागण्या

  • स्पर्धा परीक्षा व शासकीय भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणावी.
  • पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात.
  • दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी.
  • विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था उभारावी.

अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीमाराचा निषेधही व्यक्त केला. शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर होणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. या आक्रोश मोर्चामुळे शेगाव शहरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment