शेगाव (डी ललित) : 22 जुलै – नगर परिषद शेगाव अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील शिक्षक पदांच्या १३ रिक्त जागा अखेर पवित्र (Pavitra) पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेसाठी अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा आणि निवेदने देण्यात आली होती. अखेर या प्रयत्नांना यश मिळाल्याने शिक्षक भरती प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ही प्रक्रिया AIMIM शेगाव शहराध्यक्ष वसीम पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पक्षाचे नगरसेवक मुख्तार ठेकेदार, अमजद सेठ, जब्बार ठेकेदार आणि गटनेते नदीम पटेल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने देऊन रिक्त पदे लवकरात लवकर पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याची मागणी करण्यात आली होती.
नगर परिषद शाळांमध्ये दीर्घकाळापासून शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर रिक्त पदे पवित्र पोर्टलवर अपलोड होणे हे शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या यशाबद्दल सहकार्य करणारे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही शिक्षण, विकास आणि जनहिताच्या विविध प्रश्नांवर अशाच प्रकारे सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही AIMIM पदाधिकाऱ्यांनी दिली. (युवा क्रांती वृत्तसेवा)









