---Advertisement---

Shegaon १९ ऑगस्टला पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल; वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत शहरातील काही प्रमुख मार्गांवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. या कालावधीत विविध प्रकारच्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून, वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री गजानन महाराज मंदिर हा पालखीचा प्रमुख मार्ग राहणार आहे. त्यामुळे या मार्गावर तसेच परिसरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत.

खामगावकडून शेगावात येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग

खामगावकडून शेगावकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच इतर वाहनांना नियोजित पर्यायी मार्गाने प्रवेश देण्यात येणार आहे. बसस्थानक, आप्पाभाऊ साठे चौक, श्रीराम नगर, राजे संभाजी महाराज चौक, मुरारका विद्यालय चौक, जय ज्योती जय क्रांती चौक, आनंद विसावा, आनंद सागर समोरील बाळापूर रोडने खामगाव किंवा अकोलाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अकोला रोड व वरवट बकाल रोडवरील लहान वाहनांना पर्यायी मार्ग

अकोला व वरवट बकालकडून येणाऱ्या कार, टेम्पो, पिकअप व्हॅन, मोटारसायकल आदी लहान वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

अकोला रोडवरील वाहनांना झाडेगाव फाटा, इंदिरा नगर, भुस्कटी मळ्याजवळून चारमोरे पुलाखालून, चारमोरे जंक्शन पॉईंट, जुने महादेव मंदिर, तिनपुतळे जवळील चौक, सावित्रीबाई फुले चौक, जय ज्योती जय क्रांती चौक, आनंद विसावा समोरील बाळापूर रोडमार्गे खामगाव किंवा अकोलाकडे जाता येणार आहे.

वरवट बकाल रोडवरील वाहनांसाठीही उड्डाण पुलाखालून धनगर नगर टर्निंग, शिवमल्हार गेस्ट हाऊस, काँग्रेस नगर, कृष्णाजी मळा, चारमोरे पूल, चारमोरे जंक्शन पॉईंट आदी मार्गे पुढे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

अकोला व वरवट बकालकडून येणाऱ्या अवजड वाहनांना, मोठे ट्रक-कंटेनर व एसटी बसेस वगळता, उड्डाण पुलावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक, अग्रसेन चौक, बसस्थानकाजवळील ऑटो स्टॉप, आप्पाभाऊ साठे चौक, श्रीराम नगर, राजे संभाजी महाराज चौक, मुरारका विद्यालय चौक, जय ज्योती जय क्रांती चौक, आनंद विसावा आणि बाळापूर रोडमार्गे खामगाव किंवा अकोलाकडे जाण्याचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

पालखी मार्गावर वाहतुकीला निर्बंध

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री गजानन महाराज मंदिर हा पालखीचा मार्ग असल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. सामान्य रुग्णालयासमोरून नवीन काँक्रीट रोडने संस्थानच्या वाहनतळाच्या मागील बाजूने चारमोरे, तसेच अग्रसेन चौक, बस स्थानक परिसर, माळीपुरा, नागझरी रोड आदी मार्गांचा आवश्यकतेनुसार वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पालखी सोहळ्याच्या काळात शहरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गाचा वापर करावा, तसेच वाहतूक पोलिस व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment