शेगाव | (डी ललित) : शहरातील विविध भागांत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे नागरिक व वाहनचालकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत आमदार डॉ. संजय कुटे यांनी नगरपरिषद प्रशासनाला तातडीने आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने या सूचनांची अंमलबजावणी सुरू करत अनधिकृत गतिरोधक हटविण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे.
अनधिकृत गतिरोधकांमुळे वाहनचालक व नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर दोन युवा पत्रकारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. या मागणीची आमदार डॉ. संजय कुटे यांनी तत्काळ दखल घेत संबंधित प्रशासनाशी पाठपुरावा केला आणि शहरातील अनधिकृत गतिरोधक हटविण्याच्या सूचना दिल्या.
आमदार कुटे यांच्या सूचनेनंतर नगरपरिषद प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई सुरू केल्याने अनधिकृत गतिरोधक हटविण्याची मागणी करणाऱ्या शेगावकरांना दिलासा मिळाला आहे. शहरातील नियमबाह्य गतिरोधकांमुळे वाहनचालकांना होणारा नाहक त्रास कमी होण्याची शक्यता असून, उर्वरित अनधिकृत गतिरोधकांवरही तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, नागरिकांच्या समस्येची तत्काळ दखल घेत नगरपरिषद प्रशासनाला आवश्यक सूचना केल्याबद्दल आमदार डॉ. संजय कुटे यांचे नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








