शेगाव |(डी ललित): शेगाव शहरातील गोलखेड रोडवरील पठाणीच्या मळ्यात एका विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. ही घटना शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत नामदेव पांडुरंग वाघमारे (वय ४८, रा. जोगळी फैल, शेगाव) यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. शेतात काम करीत असताना विहिरीजवळ गर्दी झाल्याचे दिसल्याने ते तेथे गेले. त्यावेळी विहिरीत एक इसम तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतकाची उंची अंदाजे साडेपाच फूट असून, रंग निमगोरा, वय अंदाजे ४० वर्षे आहे. अंगात पांढरा शर्ट व काळी पॅन्ट असून डोक्याचे केस काळे-पांढरे असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कलम १९४ BNSS अन्वये नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे प्राथमिक कारण विहिरीत पडून झाल्याचे नमूद करण्यात आले असून, घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भामोकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृतकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)







