शेगाव(युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील भैरव चौक परिसरात एका महिलेचा पाठलाग करून तिचा हात पकडत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय 30, रा. पेठ मोहल्ला, शेगाव) यांच्या तक्रारीवरून आरोपी शेख मोसीन शेख अश्पाक (रा. जोगडीफैल, बुल शेगाव) याच्याविरुद्ध अंतर्गत कलम 74, 75, 78, 352 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 17 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास फिर्यादी या ब्युटी पार्लरमधून घरी जात असताना भैरव चौकातील इंदिरा दुध डेअरीसमोर आरोपी समोरून आला. आरोपीने विनाकारण धक्का मारल्याने फिर्यादींनी जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करत त्यांचा डावा हात पकडून ओढण्याचा प्रयत्न केला.
तसेच फिर्यादी कोठेही जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीने हात पकडताच फिर्यादींनी आरडाओरडा केला. यानंतर शेगाव शहर पोलिसांत तोंडी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड पोउपनी गावंडे करीत आहेत.







