टुनकी (आकाश बोरसे) : दि. 19 मे रोजी टुनकी येथील शिवाजी विजय वरणकार (इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर) यांनी महिन्याला तब्बल ₹2 लाख वेतनाच्या नोकरीचा राजीनामा देत संन्यास स्वीकारला असून, त्यांच्या या निर्णयाचे वरणकार परिवाराने पूर्ण समर्पणाने स्वागत केले आहे. दीक्षा घेतल्यानंतर त्यांचे नामकरण “मुरली वंदन प्रभू” असे करण्यात आले आहे.
संन्यास स्वीकारल्यानंतर मुरली वंदन प्रभू यांनी प्रथमच आपल्या वरणकार परिवाराला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी परिवारातील सदस्यांना अध्यात्म, परमात्मा प्राप्ती आणि धर्म जागरण याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थित परिवारातील सदस्य भारावून गेले.
वरणकार परिवारासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून, उच्च पगाराची नोकरी आणि ऐषआरामाचे जीवन सोडून अध्यात्माची वाट निवडल्याने समाजातही त्यांच्या निर्णयाची चर्चा होत आहे.

मुरली वंदन प्रभू यांनी आपल्या गुरुंसोबत कंबोडिया आणि मलेशिया येथे धर्म जागरण व परमपिता परमेश्वराच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी प्रवास केला आहे. तसेच आगामी काळात अमेरिकेतही त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा योग येणार असल्याची माहिती परिवाराने दिली.
जनतेची सेवा, धर्मप्रसार आणि परमात्मा प्राप्तीसाठी त्यांनी स्वीकारलेला संन्यास भविष्यातही समाजासाठी प्रेरणादायी ठरो, तसेच त्यांच्या हातून अखंड जनसेवा घडत राहो, अशा भावना वरणकार परिवाराने व्यक्त केल्या आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








