२५ मे पर्यंत अर्ज करण्याची संधी; अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाभ
बुलढाणा (जिमाका)(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 15 मे-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये इयत्ता १ लीमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आता २५ मे २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले आहे.
प्रवेश अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालय तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली असून यापूर्वीची अंतिम तारीख १० मे २०२६ होती.
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे अनुसूचित जमातीचा दाखला, वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असल्याचा तहसीलदारांचा दाखला, आधार कार्ड प्रत, संमतीपत्र आणि दोन पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता १ लीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय ६ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे.
आदिम जमातीतील विद्यार्थी, विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्ता तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार आहे. अपूर्ण कागदपत्रे किंवा खोटी माहिती आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.







