---Advertisement---

विदर्भात ‘बॉलर्स की खोज’ उपक्रमाची घोषणा; उदयोन्मुख गोलंदाजांसाठी सुवर्णसंधी!!

---Advertisement---

नागपूर (युवा क्रांती वृत्तसेवा) : २१ एप्रिल २०२६-विदर्भातील क्रिकेटमधील नवोदित गोलंदाजांना संधी देण्यासाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) तर्फे ‘बॉलर्स की खोज’ या खुल्या निवड चाचण्यांची घोषणा करण्यात आली आहे. हा उपक्रम आगामी विदर्भ प्रीमियर लीग (VPL) सीझन २ च्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असून, तळागाळातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा VCA चा उद्देश आहे.

या निवड चाचण्या विदर्भातील विविध जिल्हा केंद्रांवर, विशेषतः बुलढाणा जिल्ह्यात आयोजित केल्या जाणार आहेत. यात पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांतील इच्छुक गोलंदाजांना सहभाग घेता येणार आहे. खेळाडूंचे मूल्यमापन अनुभवी प्रशिक्षक आणि निवड समितीमार्फत करण्यात येईल. यामध्ये विशेषतः गोलंदाजीचा वेग (Raw Pace), फिरकी कौशल्य (Spin) आणि एकूण कामगिरी यावर भर दिला जाणार आहे.

निवड झालेल्या खेळाडूंना नागपूर येथे होणाऱ्या विशेष प्रशिक्षण शिबिरासाठी आमंत्रित करण्यात येईल. या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शन, फिटनेस प्रशिक्षण तसेच वरिष्ठ खेळाडूंसोबत संवादाची संधी मिळणार आहे. यशस्वी खेळाडूंना १ जून ते १५ जून २०२६ दरम्यान होणाऱ्या VPL सीझन २ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.

VCA च्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “विदर्भ हा नेहमीच क्रिकेट प्रतिभेचा भक्कम केंद्र राहिला आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही ग्रामीण आणि दुर्गम भागातील खेळाडूंना समान संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. भविष्यात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या खेळाडूंची फळी तयार करणे, हे आमचे ध्येय आहे.”

या चाचण्या पुरुषांसाठी १६ ते २५ वर्षे आणि महिलांसाठी १५ ते २३ वर्षे वयोगटासाठी खुल्या आहेत. इच्छुकांनी संबंधित केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून, योग्य क्रिकेट पोशाख (शक्यतो पांढरा) परिधान करणे आणि वयाचा वैध पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे.

चाचण्यांचे सविस्तर वेळापत्रक आणि ठिकाणांची माहिती लवकरच VCA च्या अधिकृत संकेतस्थळावर व सोशल मीडिया माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

संपर्कासाठी :
बुलढाणा जिल्हा क्रिकेट समिती संयोजक
श्री किशोर वाकोडे
📞 मोबाईल : ८८५५०७९५६७

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment