शेगाव, दि. 22 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहरातील विश्वनाथनगर परिसरात राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शितल ज्ञानेश्वर राठोड (वय 30, रा. विश्वनाथनगर, शेगाव) यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी शेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
सामान्य रुग्णालयातील कक्षसेवक राजू एकाडे यांनी डॉ. अजिंक्य वराडे यांच्या स्वाक्षरीचे पोलीस इन्फॉर्म मेमो शेगाव शहर पोलीस ठाण्यात सादर केले. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यू क्रमांक 36/2026, कलम 194 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत नोंद केली आहे.
पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय करुटले करीत असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.








