संग्रामपूर(आकाश बोरसे): काकणवाडा परिसरात सोमवारी दुपारी नदीपात्रात अचानक बिबट्याचे थरारक दर्शन झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीपात्राच्या काठावर शेतकामासाठी गेलेल्या शेतमजुरांना बिबट्या दिसताच एकच खळबळ उडाली.
याबाबतची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला. घटनास्थळी वनरक्षकांचे पथक दाखल झाले असून परिसराची तपासणी सुरू आहे. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी नदीपात्रात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
वनविभागाने सावधगिरीचा इशारा देत परिसरातील शेतकरी व शेतमजुरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः जनावरे चरण्यासाठी नदीकाठी न नेता सुरक्षित स्थळी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच नागरिकांना नदी परिसरात जाण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली असून अनावश्यक गर्दी करू नये, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
काकणवाडा परिसरात ही घटना मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहे. लहान मुले, महिला, शेतकरी आणि शेतमजुरांनी विशेष काळजी घ्यावी, अशी सूचना वनविभागाने केली आहे.
परिसरातील सर्व नागरिकांनी प्रशासनाचे आदेश पाळून सुरक्षित राहावे, अशी विनंती ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)












