शेगाव (प्रशांत पवार) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत शेगाव येथील सेठ ग. भी. मुरारका हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावर मजल मारली आहे. दि. २४ सप्टेंबर रोजी सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे या स्पर्धा पार पडल्या. बुलढाणा, चिखली, मेहकर, नांदुरा, खामगाव व शेगाव तालुक्यातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
१४ वर्षे वयोगटात साहिल संतोष शेगोकार व आयुष शेगोकार यांनी आर्टिस्टिक पेअरमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. श्लोक राहुल तायडे याने आर्टिस्टिक सिंगलमध्ये द्वितीय, तर जय विठ्ठल टापरेकर व शुभम राहुल गवई यांनी रिदमिक पेअरमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.
१७ वर्षे वयोगटात आलोक तायडे व विवेक प्रकाश वरणकर यांनी आर्टिस्टिक पेअरमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. आलोक राहुल तायडे याने आर्टिस्टिक सिंगलमध्ये द्वितीय, तर विवेक प्रकाश वरणकर याने तृतीय क्रमांक मिळविला. अथर्व विलास तायडे व अभिराज चंद्रशेखर कराळे यांनी रिदमिक पेअरमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.
१९ वर्षे वयोगटात विवेक प्रकाश समदूर व सम्राट संतोष शेगोकार यांनी रिदमिक योगासन प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. राजवीर अमोल वाकोडे व सम्राट संतोष शेगोकार यांनी आर्टिस्टिक योगासन प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. सुरज किसन भालेराव याने ट्रॅडिशनल तसेच आर्टिस्टिक सिंगल प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला.
दरम्यान, दि. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतही मुरारका हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. १९ वर्षे वयोगटात राजरत्न अंकुश शेगोकार व सम्यक गजानन शेगोकार यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सेठ सतीशजी मुरारका, मुख्याध्यापक डी. व्ही. हाडोळे तसेच शिक्षकवृंदांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक विनोद श्रीकृष्ण भारसाकळे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








