बुलढाणा |(युवा क्रांती वृत्तसेवा) दि. 26 सप्टेंबर –पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी विनाविलंब नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहेत. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तातडीने विशेष पीक कर्ज शिबिरांचे आयोजन करून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
अनियमित पर्जन्यमानामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री मकरंद पाटील 24 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, लीड बँकेचे कौशद्रसिंह कुमार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विजय सवळे, ॲड. नाझेर काझी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान पालकमंत्री मकरंद पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, ग्रामीण तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी तालुकास्तरावर विशेष पीक कर्ज शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले. या शिबिरांमध्ये पात्र शेतकऱ्यांचे अर्ज, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि कर्ज प्रकरणांवरील कार्यवाही तातडीने पूर्ण करून पीक कर्जाचे वितरण सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ ज्या बँकेच्या शाखेमार्फत शेतकऱ्याला मिळाला आहे, त्याच संबंधित बँकेने चालू खरीप हंगामासाठी पात्र शेतकऱ्याला नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. नवीन कर्जासाठी शेतकऱ्यांना इतर बँकांच्या शाखांमध्ये विनाकारण जावे लागू नये, याची दक्षता संबंधित शाखा व्यवस्थापकांनी घ्यावी, असेही निर्देश मकरंद पाटील यांनी दिले.

शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक वित्तपुरवठा वेळेत मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा टाळाटाळ होऊ नये. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर विहित प्रक्रियेनुसार कर्ज मंजुरी आणि वितरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
जिल्ह्यातील 282 बँक शाखांना 1 लाख 16 हजार खात्यांसाठी 970 कोटी रुपयांच्या खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 6 हजार 500 खात्यांना 78 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. विशेषतः खासगी बँकांनी पीक कर्ज वितरणाचा वेग वाढवून पात्र शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार मनोज कायंदे, संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तातडीने विशेष पीक कर्ज शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि सर्व संबंधित बँकांना देण्यात आले आहेत.
पात्र शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष पीक कर्ज शिबिरांचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रांसह कर्ज प्रकरणे सादर करावीत आणि खरीप हंगामासाठी उपलब्ध पीक कर्ज सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे.









