---Advertisement---

Buldhana :बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू; १ ऑक्टोबरपासून ऑफलाइन प्रक्रिया बंद!!

---Advertisement---

बुलढाणा | (जिमाका) (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. ३० सप्टेंबर – बुलढाणा येथील राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींच्या तपासणी व दिव्यांग प्रमाणपत्र वितरणासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे १ ऑक्टोबर २०२६ पासून दर बुधवार व शुक्रवार घेण्यात येणारी दिव्यांग तपासणी बोर्डाची ऑफलाइन प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे आतापर्यंत दिव्यांग व्यक्तींच्या तपासणीसाठी प्रत्येक महिन्यातील बुधवार व शुक्रवार दिव्यांग बोर्ड घेण्यात येत होता. तसेच दिव्यांग प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने केली जात होती. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाला ऑनलाइन प्रणालीसाठी आवश्यक आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या सुविधेमुळे जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र वितरण प्रणाली ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. परिणामी, १ ऑक्टोबर २०२६ पासून बुधवार व शुक्रवारची पूर्वीची ऑफलाइन तपासणी प्रक्रिया बंद करण्यात येत आहे.

दिव्यांग व्यक्तींनी तपासणी तसेच दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथील संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे. ऑनलाइन प्रणाली सुरू झाल्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत सुलभता आणि अधिक सुव्यवस्थित कार्यवाही होण्यास मदत होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment