---Advertisement---

शिक्षक दांपत्याचा अनुकरणीय निर्णय! सुपुत्राचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत; सरकारी शिक्षणावर दाखवला विश्वास!!

---Advertisement---

आसलगाव | (आकाश बोरसे) : सध्याच्या काळात अनेक पालक आपल्या पाल्यांना महागड्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी धडपड करताना दिसतात. अशा परिस्थितीत आसलगाव येथील आदर्श शिक्षक दांपत्य दिलीप जानराव वानखडे आणि सुनीता दिलीप वानखडे यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. त्यांनी आपल्या सुपुत्र चि. शर्व दिलीप वानखडे याचा प्रवेश स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता तिसरीत करून सरकारी शिक्षण व्यवस्थेवर ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

आजही गुणवत्तापूर्ण शिक्षण केवळ खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच मिळते, अशी धारणा अनेक पालकांमध्ये आहे. मात्र स्वतः शिक्षक असूनही वानखडे दांपत्याने आपल्या मुलासाठी जिल्हा परिषद शाळेची निवड करून या समजुतीला छेद दिला आहे. सरकारी शाळांतील गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारक्षम वातावरण आणि अनुभवी शिक्षकांवर त्यांनी दाखवलेला विश्वास समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या निर्णयाचे परिसरात सर्वत्र स्वागत होत असून, स्थानिक नागरिकांनी वानखडे दांपत्याचे कौतुक केले आहे. “केवळ वर्गात शिकवून शिक्षक होता येत नाही; आपल्या कृतीतून समाजाला दिशा देणारा खरा शिक्षक असतो. दिलीप वानखडे यांनी ते कृतीतून सिद्ध केले आहे,” अशी भावना नागरि कांनी व्यक्त केली.

यावेळी वानखडे दांपत्य म्हणाले, “गुणवत्ता ही शाळेच्या इमारतीत किंवा फीच्या आकड्यांत नसते. ती शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत, विद्यार्थ्यांवरील संस्कारांत आणि शाळेच्या वातावरणात असते. आमच्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देताना आम्हाला अभिमान वाटत आहे.”

शिक्षक पालकांनीच जिल्हा परिषद शाळांवर विश्वास दाखवल्याने ग्रामीण भागातील सरकारी शाळांबाबत समाजात सकारात्मक संदेश गेला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि संस्कारक्षम वातावरण अधोरेखित झाले आहे.

वानखडे दांपत्याच्या या अनुकरणीय निर्णयाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या या सकारात्मक पावलामुळे अनेक पालकांना आपल्या पाल्यांच्या शाळा निवडीबाबत नव्याने विचार करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment