लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा, तरी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष सुरूच!
संग्रामपूर | (आकाश बोरसे) : दि. 15 जुलै-संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी येथे अनेक वर्षांपासून भीषण पाणीटंचाईची समस्या कायम असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. शासनाने जल जीवन मिशन तसेच इतर ग्रामीण पाणीपुरवठा योजनांवर लाखो रुपयांचा निधी खर्च केल्याचा दावा केला असला, तरी गावात आजही नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी संग्रामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करून जल जीवन मिशन तसेच इतर पाणीपुरवठा योजनांअंतर्गत करण्यात आलेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित कामांवरील खर्च, कामांची गुणवत्ता आणि प्रत्यक्ष लाभ यांची तांत्रिक व आर्थिक तपासणी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कंत्राटदार किंवा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात नियमित नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक कुटुंबांना खासगी टँकर किंवा विकतचे पाणी घेण्याची वेळ येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून त्यांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
याशिवाय, गावातील उपलब्ध पाणी मोठ्या प्रमाणात क्षारयुक्त (खारट) असल्याने ते पिण्यास अयोग्य ठरत आहे. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, विशेषतः मूत्रपिंड (किडनी) संबंधित आजार वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
गावाला तातडीने स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, जल जीवन मिशनअंतर्गत झालेल्या सर्व कामांची निष्पक्ष चौकशी करावी आणि गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या निवेदनावर कासम वजीर सुरतने आणि अकबर मुसा सुरतने यांच्या स्वाक्षऱ्या असून, आलेवाडीतील नागरिकांच्या मूलभूत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








