बुलढाणा,(आकाश बोरसे) :दि. 19 जुलै-संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील एका खातेदाराने सायबर फसवणुकीतून प्राप्त झालेली रक्कम स्वतःच्या बँक खात्यात स्वीकारून ती विविध खात्यांमध्ये हस्तांतरित केल्याप्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 58 हजार 250 रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समानवय (SAMANVAY) पोर्टलवरील मनी ट्रेल विश्लेषणादरम्यान बावनबीर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील अकाउंट क्रमांक 2503****781 मध्ये सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ही रक्कम विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या खात्याचा वापर सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी करण्यात आल्याचा संशय असून, या खात्यामार्फत एकूण 58 हजार 250 रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई विनोद शिंबरे यांच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलीस ठाण्यात कायम दखलपात्र गुन्हा क्रमांक 209/2026 नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक फौजदार दिलीप खंडागळे यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
दरम्यान, सोनाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या बँक खात्यात अनोळखी व्यक्तीकडून किंवा अज्ञात स्रोतामधून पैसे जमा झाल्यास त्याची तात्काळ माहिती संबंधित बँक, जवळचे पोलीस ठाणे किंवा सायबर पोलीस शाखेला द्यावी. तसेच कोणत्याही आमिषाला किंवा आर्थिक मोबदल्याच्या प्रलोभनाला बळी पडून स्वतःचे बँक खाते इतरांच्या वापरासाठी देऊ नये. अन्यथा खातेदारालाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. (युवा क्रांती वृतसेवा)









