जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : दि. 6 जुलै रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आयोजित 19व्या नॅशनल डेजबॉल स्पर्धेत जळगाव जामोद तालुक्यातील पंचाळा येथील भक्ती खानझोड हिने सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार डॉ. संजय कुटे यांनी भक्ती खानझोड हिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना त्यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना भक्तीसारख्या होतकरू खेळाडूंकडून प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.
आमदार कुटे म्हणाले, “भक्तीची जिद्द, मेहनत आणि चिकाटी कौतुकास्पद आहे. भविष्यात ती जागतिक स्तरावरही यश संपादन करून आपल्या भागाचे नाव उंचावेल, असा विश्वास आहे.”
भक्तीच्या या यशामुळे पंचाळा परिसरात आनंदाचे वातावरण असून गावकरी, क्रीडाप्रेमी आणि खानझोड पाटील कुटुंबीयांनी तिचे अभिनंदन केले. विविध स्तरांतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)










