जळगाव जामोद(आकाश बोडसे): जळगाव जामोद तालुक्यातील मौजे उमापूर येथे महसूल व पोलिस प्रशासनाने बेकायदेशीर मुरूम उत्खनना विरोधात मोठी संयुक्त कारवाई करत माफियांना जोरदार दणका दिला आहे. या कारवाईदरम्यान मुरूम उत्खननासाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी मशीन जप्त करण्यात आले असून, दोन टिप्पर चालक मात्र अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.
ही धडक कारवाई 18 मे 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे तहसीलदार पवन पाटील आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीनकुमार पाटील यांनी आपल्या संयुक्त पथकासह मौजे उमापूर येथील गट क्रमांक 2 च्या पूर्व दिशेला छापा टाकला.
छाप्यामध्ये घटनास्थळी जेसीबी मशीन (क्र. MH 18 BX 0679) द्वारे बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. तसेच, उत्खननातून काढलेला मुरूम वाहतुकीसाठी दोन टिप्परही तेथे उभे होते. मात्र, महसूल आणि पोलिसांचा मोठा ताफा अचानक समोर येताच टिप्पर चालकांनी वाहनांसह घटनास्थळावरून पळ काढला.
रात्रीचा अंधार आणि टिप्पर दूर अंतरावर असल्यामुळे वाहनांचे क्रमांक समजू शकले नाहीत. मात्र, प्रशासनाने तत्परता दाखवत उत्खनन सुरू असलेले जेसीबी मशीन जागीच जप्त केले. हे जेसीबी पुढील कारवाईसाठी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार पवन पाटील व ठाणेदार नितीनकुमार पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी व्ही. एस. शिंदे, व्ही. आर. रहाटे, एस. टी. त्रिभूवन, जी. पी. सोनोने, एस. पी. माळोदे यांच्यासह पोलीस विभागाचे पीएसआय नारायण सरकटे, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन शेळके आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल डब्बे सहभागी होते.(युवा क्रांती वृत्तसेवा)
19 मे रोजी जप्ती पंचनामा करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.








