जळगाव जामोद | (युवा क्रांती वृत्तसेवा) : मिशन परिवर्तन मोहिमेअंतर्गत अमली पदार्थांविरोधात जळगाव जामोद पोलिसांनी मोठी कारवाई करत २ किलो ३०० ग्रॅम गांजासह दुचाकी आणि मोबाईल असा एकूण २ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २६ मे रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास खेर्डा रोडवरील कॉटन मार्केट परिसरात जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी नाकाबंदी करीत होते. यावेळी एका इसमाकडून गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
दरम्यान, एमएच ३० बीयू ०२४५ क्रमांकाची बजाज प्लॅटिना दुचाकी संशयास्पदरीत्या येताना दिसताच पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली. संबंधित इसमाने आपले नाव उत्तम शाहदेव तायडे (वय ५५, रा. दानापूर, ता. तेल्हारा, जि. अकोला) असे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता डिक्कीत ठेवलेल्या पिशवीत गांजा आढळून आला. पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाचे वजन २ किलो ३०० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत १ लाख १८ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या कारवाईत आरोपीकडून गांजासह ७२ हजार रुपयांची बजाज प्लॅटिना मोटारसायकल आणि १२ हजार रुपयांचा रेडमी कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. एकूण २ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३८/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली.








