जळगाव जामोद, (आकाश बोरसे) : दि. २२ जुलै – दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जळगाव जामोद तालुक्यातील विद्यार्थी व तरुणांच्या वतीने उपविभागीय अधिकारी (एसडीएम) यांच्यामार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच देशभरातील विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेतील पेपरफुटी प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणांची जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
यासोबतच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुग आणि अभिजीत दीपके यांच्या उपोषणाला नैतिक पाठिंबा व्यक्त करण्यात आला. त्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थी व युवकांच्या भावना लक्षात घ्याव्यात, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी राजरत्न वाकोडे, मुकेश वानखडे, चेतन तायडे, अजय वानखडे, सिद्धांत तायडे, अभय तायडे, हर्षवर्धन अंभोरे, प्रदीप वानखडे, साहिल देशमुख, अमर तायडे, पियुष पवार, सुमेध वानखेडे, तिलक वानखडे आणि नंदू तायडे यांच्यासह विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)









