नवी दिल्ली : नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या गोंधळामुळे सातत्याने टीकेचे धनी ठरलेले केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर आली आहे.
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांसह विविध संघटना आणि नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
सतत वाढणारा जनक्षोभ, शिक्षण व्यवस्थेवरील प्रश्नचिन्हे आणि विरोधकांकडून होत असलेली टीका यामुळे निर्माण झालेल्या राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी कोणाकडे सोपविण्यात येणार, तसेच नीट परीक्षा प्रकरणातील पुढील चौकशी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा याबाबत केंद्र सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.
मात्र, राजीनाम्याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत सविस्तर प्रतिक्रिया किंवा पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे.









