जळगाव जामोद (आकाश बोरसे) : दि.५ जून-शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या समर्थनार्थ सध्या सोशल मीडियावर भावनिक मोहीम सुरू झाली आहे. आपल्या कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता आणि धडाडीच्या कामामुळे ओळख निर्माण करणारे जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आणि खंत व्यक्त होत आहे.
जळगाव जामोद पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर नितीन पाटील यांनी शहरात शिस्तीचे वातावरण निर्माण केले होते. काळी हळद, नागमणी यांसारख्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रकारांवर त्यांनी कठोर कारवाई करत आळा घातला. तसेच गरीब, निराधार आणि दीन-दुबळ्या नागरिकांना तत्काळ न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला.
शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलत कायद्याचा धाक निर्माण केला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल विश्वास निर्माण झाला होता.
दरम्यान, एका मुलीच्या कथित मृत्यू प्रकरणामुळे नितीन पाटील हे वादाच्या भोवऱ्यात सापडले. संबंधित प्रकरणात पिता-पुत्र बापूराव आणि अजय कळमेकर यांनी खुनाची कबुली दिल्याचे समोर आले होते. मात्र तपास सुरू असतानाच संबंधित तरुणी स्वतः समोर येत “मी जिवंत आहे” असे सांगितल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
या घटनेनंतर पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नितीन पाटील यांची जळगाव जामोद पोलीस ठाण्यातून बदली करत त्यांची नियुक्ती जिल्हा नियंत्रण कक्षात केली.
विशेष म्हणजे, कारागृहातून सुटल्यानंतर संबंधित पिता-पुत्रांनी पोलिसांनी कोणताही दबाव आणला नसल्याचे स्पष्ट केले. पोलीस कोठडीत चांगली वागणूक मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलीस प्रशासनावर होत असलेल्या टीकेची धार काहीशी कमी झाली आहे.
तथापि, अशा कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील अधिकाऱ्याची बदली झाल्यामुळे जळगाव जामोदमधील नागरिक दुखावले गेले आहेत. “असा अधिकारी पुन्हा मिळणे कठीण आहे,” अशा भावना नागरिक व्यक्त करत असून सोशल मीडियावर “आम्ही नितीन पाटील साहेबांसोबत आहोत” अशा आशयाच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहत नागरिकांनी त्यांच्या कामाला दिलेली ही एक प्रकारची पोचपावती मानली जात आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








