---Advertisement---

शिवानी कळमेकर प्रकरणात निलंबनांची मालिका; DGP सदानंद दाते उद्या जळगाव जामोदमध्ये!!

---Advertisement---

जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : दि. 7 जून-राज्यभर गाजत असलेल्या शिवानी कळमेकर प्रकरणात कारवाईचे सत्र आणखी तीव्र झाले असून निलंबित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या आता सहावर पोहोचली आहे. या प्रकरणातील तपासातील त्रुटी आणि कथित हलगर्जीपणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ स्तरावरून सलग कारवाया सुरू असल्याने संपूर्ण पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

यापूर्वी बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी एका पोलिस उपनिरीक्षकासह तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते. त्यानंतर अमरावती पोलिस आयुक्तांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर तसेच जळगाव जामोद पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांना निलंबित केले आहे.

दरम्यान, राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे 8 जून रोजी जळगाव जामोद येथे दाखल होणार असून ते या संपूर्ण प्रकरणाचा थेट आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आणखी कोणावर कारवाई होणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

26 एप्रिल रोजी जळगाव जामोद पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या ‘सरकटी लाश’ हत्याकांडाने राज्याच्या गृहविभागाचे लक्ष वेधले आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यात आलेला गोंधळ, कथित मृत व्यक्ती जिवंत असल्याचे समोर येणे तसेच बनावट तपासाचे आरोप यामुळे बुलढाणा पोलिसांच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

तपासासाठी तब्बल नऊ अधिकारी आणि 26 अंमलदारांची टीम कार्यरत असतानाही मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसल्याने या प्रकरणाची गुंतागुंत अधिक वाढली आहे. DGP दाते यांच्या दौऱ्यात केस डायरी, स्टेशन डायरी, फॉरेन्सिक अहवाल, आंतरराज्य तपासाची दिशा आणि पोलिसांनी उचललेल्या कायदेशीर पावलांचे सखोल परीक्षण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“26 एप्रिलपासून तपासात नेमकी प्रगती का झाली नाही?”, “सुरुवातीच्या तपासात हलगर्जीपणा झाला का?”, “खोटा तपास कोणी आणि का केला?” या प्रश्नांची उत्तरे आता संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी लागणार असल्याची चर्चा आहे.

या दौऱ्यानंतर आणखी निलंबन किंवा सक्तीच्या बदल्यांची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिस यंत्रणेत मोठी धास्ती निर्माण झाली आहे. सातपुड्याच्या कुशीत दडलेले हे गूढ प्रकरण DGP दाते यांच्या हस्तक्षेपानंतर उलगडणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment