संग्रामपूर | (आकाश बोरसे) : संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील बालाजी मंदिरातून चांदीच्या धार्मिक वस्तू चोरीला गेल्याप्रकरणी तामगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला सुमारे ₹1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनलाल सुखदेव चांडक (रा. वानखेड, ता. संग्रामपूर) यांनी 16 जुलै 2026 रोजी तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, 15 जुलै रोजी सकाळी सुमारे 6.10 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने वानखेड येथील बालाजी मंदिरातील रामदेव बाबा मूर्तीच्या चांदीच्या पादुका, चांदीचे छत्र आणि चांदीचा घोडा असा सुमारे 550 ग्रॅम वजनाचा व ₹1 लाख 25 हजार किमतीचा ऐवज चोरी केला होता.
या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात अपराध अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305(d) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच तामगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून गोपनीय माहितीच्या आधारे अमोल कमलाकर छळकर आणि गजानन सुरेश सोळंके, दोघेही रा. वानखेड, यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या चांदीच्या सर्व धार्मिक वस्तू जप्त केल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश बोरसे, संतोष डाखोरकर, संतोष आखरे व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद मिरे यांच्या पथकाने केली. (युवा क्रांती वृत्तसेवा)









